छत्रपती संभाजीनगर : घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ, पहिल्याच माळेला पावसाची हजेरी; माता मंदिरे भक्तिमय वातावरणात निघाले न्हाऊन !!

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जय अंबे, दुर्गा माता की जय, सप्तृंगी माता की जय, रेणुका माता की जय म्हणत आज सर्वत्र घरोघरी घटस्थापना करण्यात आली. तसेच शहरातील माता मंदिरातही घटस्थापना करून नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज पहिल्याच माळेला सकाळीच पावसाने हजेरी लावली. मात्र तरीही अनेकांनी पावसात जाऊन मंदिरात दर्शन घेतले. तर काहींनी दुपारनंतर शहरातील माता मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. 

नवरात्र उत्सवानिमित्ताने आज पहाटे उठून महिलांनी घरोघरी रांगोळी काढून घटस्थापना करून आरती केली. पहिली माळ असल्याने आज पहाटेच अनेकांनी शहरातील कर्णपुरा माता मंदिर, बीड बायपास येथील रेणुका माता मंदिर, सिडको एन-7 येथील रेणुका माता मंदिर, हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर,  आकाशवाणी येथील दुर्गा माता मंदिरासह आदी माता मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. यावेळी मंदिराच्या वतीने देखील भाविकांसाठी दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. यावेळी शहरातील संपूर्ण माता मंदिरात मोठ्या संख्येने सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली. यावेळी जय मातेच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाले.

कर्णपुरा माता मंदिर गजबजला

शहरातील कर्णपुरा माता मंदिरात आज पहाटेपासूनच पहिल्या माळेला भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. भर पावसात मोठ्या संख्येने भाविकांनी कर्णपुरा माता मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी तुळजाभवानी माता की जय... अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाला. यावेळी भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आजपासून कर्णपुरा यात्रेला देखील सुरुवात झाली. आज यात्रेचा पहिला दिवस असल्याने अनेकांची दुकाने लावण्यासाठीही सकाळपासूनच लगबग सुरू झाली. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी आज पहाटेपासूनच पोलिसांनी देखील मंदिर 
परिसरात हजेरी लावून सहकार्य केले.

आई तुळजाभवानीची महाआरती

राज्याचे विधान परिषद माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपुरा येथील आई तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात दानवे यांच्या हस्ते विधिवत परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव शक्ती आणि प्रेरणा देणारा आहे. आई जगदंबेची आराधना करण्यासाठी सुदैवाने 11 दिवसाचा कालवधी मिळाला आहे. महिषासुराचे मर्दान केल्याचा हा उत्सव कर्णपुरा येथील शारदीय नवरात्र उत्सवाची परंपरा 350 वर्षांपासून सुरू आहे. 
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, संतोष मरमट, राजेंद्र दानवे, नंदू लबडे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री व राजश्री राणा उपस्थित होते.